1.07.2010

मी एक शेतकरी (कविता)

मी एक शेतकरी दादानु शेती माजी माय
घाम गाळुन कष्ट करुन सुदा कायच मिळत न्हाय
सरकार देतया मोठमोठ्या योजना आमच्यापतुर यत नाय
पिकाला पन भाव म्हणावा तेवढा भेटत नाय

निसर्ग पन कोपतो या पावसाला म्हणाव काय
यळ काळ बघत नाय मोसमाला पाउस यळवर नाय
कर्ज व्हते खंडीभर सावकाराची मागायची घाय
घरात दाणा नसला तर त्याला तरी देणार काय

घरची चुल माझी कितींदा तरी पेटत नाय
जीवाभावाची लेकर रडताना पाहुन डोळ्यात पाणी हुब राय
त्यांची साळा पुस्तक कराया खिसा पुरा खाली हाय
आता नको फ़ुड बघु म्हनुन वय शिकायच निगुन जाय

आसा मी यड्यावाणी पन कर्माला दोस देत राय
इख घेण यवढ्च बाकी दुसरा पर्याय नाय
जगण माज हराम झालय सांगा करु मि काय
मी एक शेतकरी दादानु शेती माजी माय
___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment